World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Jul14
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास 
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आजच्या धकाधकीच्या काळात आपला प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवणे हे यशस्वी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपले यश आपल्या प्राधान्यक्रमावर अवलंबून असते. त्यामुळेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे योग्य व्यवस्थापन शक्य होते.

प्राधान्यक्रम अचूक असला की; आपला वेळ आपल्या (आणि म्हणूनच इतरांच्याही) अंतरात्म्याला विविध प्रकारे समाधान देण्यामध्ये व्यस्त होतो आणि सर्वांगीण यशाची शिखरे सर होतात.

काहीजणांना ह्याची जाण पूर्वपुण्याईमुळे उपजतच असते. त्यामुळे, महान खेळाडू, संगीतकार, साहित्यिक, चित्रकार, अभिनिते, व्यावसायिक, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, रणझुंजार आणि विशेषत: योगी-संत-महात्मे इत्यादींचा प्राधान्यक्रम लहानपणापासून ठरलेला असतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा बहुतेक वेळ (थिल्लर बाबींमध्ये वाया ना जाता) त्यांच्या क्षेत्रातील साधनेत म्हणजेच सत्कारणी लागतो.

याउलट, आपल्यासारख्यांना प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची पुरेशी क्षमता उपजत नसते. सद्बुद्धी (सद्विचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सद्वासना आणि सत्संकल्प), सदिच्छा, सत्शक्ती यांची आपल्यामध्ये उणीव असते. त्यामुळे आपला प्राधान्यक्रम चुकतो. साहजिकच, आपल्या आयुष्यातला बराच वेळ (सत्कार्यात न जाता) थिल्लरपणात किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे नको त्या उलाढाली करण्यात वाया जातो आणि आपण सारखे पस्तावत राहतो.

नामस्मरणाने चित्तशुद्धी होते. म्हणजेच, सद्बुद्धी (सद्विचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सद्वासना आणि सत्संकल्प), सदिच्छा आणि सत्शक्ती वाढीस लागतात. यामुळे प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची आणि आयुष्यातला बहुमूल्य वेळ योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे सत्कारणी लावण्याची म्हणजेच, सत्कर्म करण्याची सर्वांगीण क्षमता वाढीस लागते आणि जीवन यशस्वी होण्याचा मार्ग प्रशस्त होतो!

“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2039)  |  User Rating
Rate It


Browse Archive