World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug22
ह्या व्यक्तींना एकत्र कोण जोडतो?: डॉ. श्रीनि&
ह्या व्यक्तींना एकत्र कोण जोडतो?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने आपल्या समाजात किती भिन्न भिन्न परंपरा आहेत याची जाणीव होते. इतक्या विविध परंपरांना आपल्या संस्कृतीमधील कोणती बाब एकत्र जोडून ठेवते?

शिक्षक: केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना एकत्र जोडून ठेवणारी जी सहज लक्षात न येणारी; पण विचारांती ठळकपणे जाणवणारी बाब आहे, तिलाच आपल्याकडे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती, आत्मप्रचीती, ब्रह्मज्ञान, असे शब्द आहेत. ह्या अनुभवालाच संत लोक नामात रंगणे किंवा नामरूप होणे म्हणतात. हा अनुभव आलेल्या व्यक्तींचे जीवन सच्चिदानंदस्वरूप (ईश्वरस्वरूप) झालेले असते. त्यांच्या अस्तित्वातच एक अवीट गोडी असते, आकर्षण असते. अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे मन हळू हळू संवेदनाक्षम, सहिष्णू आणि विशाल होते. वृत्ती निस्वार्थी आणि उदार होते. साहजिकच संघर्ष कमी आणि परस्पर जिव्हाळा अधिक; अशी अवस्था होते. साहजिकच अशा व्यक्ती; समाजात परस्पर सामंजस्य आणि एकोपा निर्माण करतात. समाजाला जोडून ठेवतात. परंतु, ह्या व्यक्तींना एकत्र कोण जोडतो?
श्लोक:
योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादि कर्म च
वेदा: शास्त्राणि विज्ञानम् एतत् सर्वं जनार्दनात्
अर्थ: योग, ज्ञान, सांख्य तत्त्वज्ञान, इतर विद्या, शिल्पादी कला, वेद, शास्त्रे, आणि विज्ञानादी सर्व काही जनार्दनापासून आहे (म्हणजे ईश्वरापासून उत्पन्न झाले आहे व त्याच्यामुळेच एकत्र जोडले गेले आहे).

विद्यार्थी: पण कुंभ मेळ्यामध्ये तर अनेक जण एकमेकांवर टीका करतात.
क्वचित प्रसंगी कोर्टात जाण्याच्या गोष्टी बोलतात आणि अनेकदा हमरीतुमरीवर आणि मारामारीवर उतरतात.

शिक्षक: आपण ह्या वरपांगी दिसणाऱ्या बाबींनी फार प्रभावित होतो आणि त्यांना फार महत्व देतो. आपल्याला देखील; सवंग गोष्टींमध्येच जास्त रस वाटतो; हे खरे नाही का? साहजिकच आपण लोकविलक्षण आणि विक्षिप्त चाळ्यांनी चाळवले जातो वा भारावून जातो वा विचलित होतो. कधी कुणी उगीच आकांडतांडव केला, तर गडबडून जातो. पण आपण नामस्मरणामध्ये राहिलो तर असे होत नाही. आपले लक्ष साधुंच्या अंतरंगाकडेच राहते.

ज्याप्रमाणे एका बीजामधून असंख्य प्रकारच्या फांद्या, पाने, फुले आणि फळे उत्पन्न होतात, पण त्याच्यापासून कधीही विलग झालेल्या नसतात, त्याचप्रमाणे सर्व विश्व, आपण सर्व आणि आपले संपूर्ण जीवन; सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याशी (नामाशी) अविभाज्यपणे निगडीत आहे; आणि तेच सर्व परंपरांना एकत्र जोडून ठेवते; हे नामस्मरण करता करता; निश्चितपणे समजू लागते व अनुभवाला येते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2654)  |  User Rating
Rate It


Browse Archive