World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १४. नेहमी साव
१४. नेहमी सावध असावे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ मान अपमान जगतात I ते मूळ कारण झाले घातासI तेथे राहावे सावधI वृत्ति करुनिया स्थिरII”, “वृत्ति शांत होणे हाच नामाचा अनुभव आहे. नेहमी सावध असावे. आणि उर्मिच्या आहारी जाऊ नये. उर्मी आवरली पाहिजे” आणि “जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला”.

पण नेहमी सावध असावे हे आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्हाला सावधानता म्हणजे आमच्या आळसामध्ये व्यत्यय वाटतो! आळसापुढे आम्हाला दुसरे काहीही सुचत नाही आणि नको असते! कारण आळस आपल्या नसानसामध्ये भरलेला असतो! हाडीमांसी खिळलेला असतो! किंबहुना, आपण आळसरूपच बनलेले असतो!

पण असे असले तरी आपले आयुष्य आणि परिस्थिती तर सतत आणि वेगाने बदलत असते! काळाला आपण थांबवू शकत नाही! बदल आपण टाळू शकत नाही! उलट, आळसापायी बेसावध असल्यामुळे आपला संकुचितपणा तसाच राहिलेला असतो, “हवे-नको”पण असते, हेकेखोरपणा तसाच असतो आणि यामुळे जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते! अश्या असमाधानातून तयार झालेली पोकळी आयुष्याच्या अखेर आपल्याला खायला येते! एका बाजूला आशा आणि हवे-नकोपण प्रचंड आणि दुसऱ्या बाजूला क्षमता मात्र संपलेली अशी आपली असहाय्य आणि दयनीय अवस्था झालेली असते. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला म्हणजे हेच!

गुरुकृपेने सतत नामस्मरण होऊ लागले की हळु हळु आळस कमी कमी होऊ लागतो. आपण सावध होऊ लागतो. सावध राहणे आणि उर्मी आवरणे आपल्या अंगवळणी पडू लागते. ह्या सावधपणामुळे; आळसांची आवड कमी होऊ लागते. आळस आपल्या हिताच्या आड येतो आहे हे कळू लागते. आपला संकुचितपणा हाव वाढवतो हे लक्षात येउ लागते. आपला क्षुद्र अहंकार आपल्याला प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आहे हे ध्यानी येऊ लागते! अधिकाधिक प्रसंगांमध्ये आपल्याला स्वत:चे अकर्तेपण आणि रामाचे कर्तेपण जाणवू लागते. ह्या जाणीवेमुळे आयुष्यात येणाऱ्या अप्रिय प्रसंगांमध्ये, संकटांमध्ये, नुकसानीमध्ये; स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपल्याला “राम कर्ता” ह्याची आठवण होते आणि आपले समाधान भंगणे कमी होते!

ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपले नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती स्थिती जिच्यामध्ये स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या; खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया अनुस्यूत असते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5312)  |  User Rating
Rate It


Browse Archive