World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug22
विलक्षण साधना: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
विलक्षण साधना: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू विलक्षण साधना करीत असताना दिसतात. सत्य जाणून घेण्यासाठी अशा कठीण साधनांची आवश्यकता आहे का?

शिक्षक: त्यांच्यासाठी ती आवश्यक आहे की नाही हे आपण कोण ठरविणार? प्रत्येक व्यक्ती आणि तिचे संचित आणि प्रकृती भिन्न असते. जडण घडण वेगवेगळी असते. संस्कार वेगळे असतात. आर्थिक, धार्मिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी प्रकारची पार्श्वभूमी वेगवेगळी असते.
मुलाला कशाची गरज आहे हे आईला ज्याप्रमाणे कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमची (आमच्यातल्या चैतन्याची) जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहानही कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्वही समजत नाही! किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन आमची माउली आमची तहान भागवतेच! मातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते, हे जसे खरे, तसेच आपल्याला चैतन्यपान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील, जरी मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण कधी “कुलदेवता”, कधी “इष्टदेवता” तर कधी “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो ! याकारणास्तव आपल्या परंपरेनुसार आलेली साधना आणि उपासना आपल्यासाठी सुलभ आणि परिणामकारक असते. इतरांच्या उपासनेशी आपल्या उपासनेची तुलना करणे योग्य ठरत नाही आणि उपयुक्तही ठरत नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे मला नीट समजू लागले. विशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली. बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1453)  |  User Rating
Rate It


Browse Archive