World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep19
जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळ
जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यावर विनाकारण वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय होतो असे म्हटले जाते. तुमचे काय मत आहे? किंबहुना; आपण ज्या ज्या गोष्टी करतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात आणि कोणत्या वाया जातात; हे कसे ठरवायचे?

शिक्षक: ज्या लोकांना ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले, त्यांना; संत, साधू, महात्मा, ऋषी, मुनी, तत्ववेत्ते, योगी, महायोगी, ज्ञानी इत्यादी म्हणतात. सत्याचा साक्षात् अनुभव घेतलेल्या लोकांना सद्गुरू म्हणतात. त्यांनी मोठ्या उदार अंत:करणाने आणि आत्मीयतेने त्यांना सापडलेले उत्तर आपल्याला सांगितले आहे.

सत् म्हणजे सत्य. “सत्कारणी” लागणाऱ्या गोष्टी म्हणजे; सत्याकडे नेणाऱ्या आणि सत्यामध्ये समरस होण्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी!

आपण रोज प्रातर्विधी करतो, आंघोळ करतो, पूजा करतो, कपडे धुतो, घरातली साफसफाई करतो, व्यायाम करतो, स्वयंपाक करतो, नोकरी-धंदा करतो, नफा कमावतो, नाव कमावतो, राजकारण करतो, सत्ताकारण करतो, मनोरंजन करतो आणि ह्याशिवाय असंख्य बऱ्या-वाईट गोष्टी करतो. ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सत्याकडे पोचवतात; म्हणजेच “सत्कारणी” लागतात? शिक्षण, क्रीडा, करमणूक, व्यापार, उद्योग, शेती, आरोग्यसेवा, संगीत, नाट्य; अशा कोणत्याही बाबीकडे पहा. ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात! म्हणजेच त्यांत घातलेले पैसे, श्रम आणि वेळ वाया जातात, व्यर्थ जातात, फुकट जातात!
वास्तविक; आपले अंतर्बाह्य व्यापणारे चैतन्य आपल्या अंत:करणातल्या आकाशात निरंतर बरसत असते. मनुष्य कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, देशाचा, वंशाचा, व्यवसायाचा वा वयाचा असो, याला अपवाद असत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य व्याधीग्रस्त असो वा निरोगी, अपंग असो वा धडधाकट, अशक्त असो वा सशक्त, व्यसनी असो वा निर्व्यसनी, अपराधी असो वा निरपराधी आणि गरीब असो वा श्रीमंत याला अपवाद असत नाही. अगदी जगभरातल्या बलाढ्य देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपवाद असत नाहीत! पण आपण; आपल्याच हृदयात बरसणाऱ्या ह्या चैतन्याच्या विस्मृतीमुळे ते इतके नजीक असतानाही त्याला ओळखत नाही आणि त्याचे महत्व जाणत नाही! उलट; त्याला पारखे होऊन चैतन्यतृष्णाक्रांत होऊन चैतन्याच्या एका एका थेंबासाठी कासावीस होत असतो, तडफडत असतो!
नामस्मरण म्हणजेच चैतन्याचे, सत्याचे स्मरण. त्याची जोड मिळाली की, आपली प्रत्येक कृती सत्कारणी लागते आणि त्याची जोड मिळाली नाही तर; म्हणजेच नामाच्याविस्मरणात; आपली प्रत्येक कृती वाया जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (6151)  |  User Rating
Rate It


Browse Archive