World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ११. आनंद हा अत
११. आनंद हा अत्यंत विशाल आहे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आनंद हा अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते”.

सद्गुरु म्हणजेच ईश्वर. तोच खरा आनंदमय असून अंतर्बाह्य सर्व काही व्यापून आहे. कालातीत आहे. पण आपण आपल्या देहात असताना आपल्यामध्ये देहाच्या मर्यादा येतात. देहाच्या गरजा, वासना, भावना, विचार, कल्पना, दृष्टीकोन यांचे गाठोडे आपल्या उरावर बसते. ह्या गाठोड्यालाच अहंकार म्हणतात. ह्या अहंकारामध्ये आपण बंदिस्त होतो आणि आपल्या विशाल आनंदमय स्वरूपापासून तुटतो आणि वेगळे होतो. ह्या वेगळेपणात अपूर्णता, अस्वस्थता, असुरक्षितता, धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भ्रम आहे.

आपल्या भ्रमामुळे आपण हे विसरतो, की आपली वृत्ति सारखी बदलत आहे. आपली स्वप्ने, आपले संकल्प, आपले आराखडे हे सारे आपल्या इच्छे–अनिच्छे पलिकडे बदलत आहेत. त्याचप्रमाणे जगही आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; सारखे बदलत आहे. आपण विसरतो, की सतत बदलत असल्यामुळे, अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे आपले वाटणे अजिबात खरे नव्हे. कारण ते सुखदु:ख अस्थिर आणि म्हणून भ्रामक आहे! साहजिकच आपण हे देखील विसरातो, की स्वत:चे असो वा जगाचे; भ्रामक दु:ख घालवण्यासाठी आपण जे तळमळतो आणि धडपडतो तो केवळ जीवनप्रवासातला एक अपरिपक्वतेचा आणि आकुंचित अवस्थेचा टप्पा आहे!

सद्गुरुंच्या सत्तेने आणि आमच्या प्रारब्धानुसार आणि देहबुद्धीपायी आलेल्या अहंकाराने धडपडता धडपडता आणि तळमळता तळमळता; सद्गुरुकृपेनेच आम्हाला नामस्मरणाचा मार्ग मिळतो आणि सद्गुरुकृपेनेच नामस्मरण वाढत जाऊन देहबुद्धी आणि अहंकाराच्या भिंती ढासळू लागतात. अश्या तऱ्हेने सद्गुरूकृपेमुळे आमचा आकुंचितपणा आणि संकुचितपणा जसा जसा कमी होत जातो आणि विशालत्व येऊ लागते तशी तशी आम्हाला आमच्या स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाची म्हणजेच विशाल आणि परिस्थितीनिरपेक्ष अशा नामानंदाची अधिकाधिक प्रचीती येत जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4046)  |  User Rating
Rate It


Browse Archive