World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug19
त्या कोट्यावधींचे काय?डॉ. श्रीनिवास जनार्
त्या कोट्यावधींचे काय?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: एकीकडे कुंभमेळ्यात जावे असे वाटते पण प्रत्यक्षात जाऊन पाहिले तर मन खिन्न होते असा अनेकांचा अनुभव आहे! श्रद्धा कमी असल्यामुळे असे होते का? पण मग अशा अश्रद्ध लोकांचे काय? शिवाय, कुंभ मेळ्यामध्ये जरी कोट्यावधी लोक जात असले तरी त्याच्या शेकडोपट लोक तिथे जाऊ शकत नाहीत. त्या कोट्यावधींचे काय? त्यांना चैतन्याचा लाभ शक्य नाही?
शिक्षक: आजपर्यंत जे महायोगी, महात्मे, ऋषी, संत; होऊन गेले ते सर्व कुंभ मेळ्यामध्ये जात होते असे नाही. त्याचप्रमाणे कुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना अमृतत्वाची प्राप्ती झाली असेही नाही. शिवाय; कुंभ मेळ्याच्या मुळाशी अमृतत्वाची प्राप्ती हा हेतू असला तरी कालांतराने त्याच्या आयोजनामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक असे अनेक पैलू नसतीलच असे नाही!
विद्यार्थी: म्हणजे, कुंभ मेळ्याकडे जसे कुत्सितपणे आणि तिरस्काराने पाहणे योग्य होणार नाही, तसेच त्याच्याकडे; मानव जातीचा एकमेव तारणहार म्हणून पाहणे देखील योग्य ठरणार नाही. खरे ना?
शिक्षक: होय! कारण, वर पाहिलेल्या कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतील कथेतल्या अमृतमंथनाशिवाय निरंतर चालणारे असे; आणखी एक विलक्षण अमृतमंथन गेली हजारो वर्षे चालू आहे! हे अद्वितीय अमृतमंथन म्हणजे नामस्मरण होय!
ह्यालाच जिक्र, जाप, जप, सुमिरन, सिमरन अशी अनेक नावे आहेत. नामस्मरणाचा गर्भितार्थ स्वत:च्या अंतरात्म्याचे विशिष्ट नावाने स्मरण करणे आणि ते करता करता; त्या नावाशी (नामाशी), म्हणजेच स्वत:च्या अंतरात्म्याशी म्हणजेच ईश्वराशी जोडले जाणे आणि त्यात विलीन होऊन अमर होऊन जाणे!
विद्यार्थी: ह्या अमृतमंथनाचे वैशिष्ट्य काय?
शिक्षक: ह्या अमृतमंथनाचे वैशिष्ट्य असे की त्यातून निघालेल्या अमृताचे सिंचन; कोण्या एका विशिष्ट जागेपुरते आणि विशिष्ट दिवसापुरते मर्यादित नाही. ह्या अमृतमंथनातून होणारे अमृतसिंचन जगभर सतत चालू आहे, प्रत्येक हृदयात (कळत असो वा नकळत) चालू आहे आणि जगाच्या कोनाकोपऱ्यात चालू आहे! ह्या सिंचनाला सोवळे, ओवळे, जात, धर्म, पंथ, उच्च, नीच, श्रीमंत, गरीब, मुहूर्त इत्यादी कशाकशाचीच अट नाही! कुठेही जाण्यायेण्याची, खर्च करण्याची, विशिष्ट आचार-विचारांची, परंपरा-रुढींची; कसलीच अट नाही. नामस्मरणरुपी अमृतमंथनाचा कल्याणकारी परिणाम आपल्या आणि समाजाच्या सर्व अंगांवर आणि सर्व पैलूंवर होतो. ह्या अमृत प्राप्तीने; जड, मर्त्य आणि त्यामुळे बद्ध असे (पापी) जीवन संपुष्टात येते आणि अमृतत्वाचा अनुभव येतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (652)  |  User Rating
Rate It


Browse Archive