World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug07
नम्रता आणि लाचारी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नम्रता आणि लाचारी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: सर, लोकांनी अपमान व छळ केला, शिव्या दिल्या किंवा अगदी मारझोड जरी केली तरी संत शांत राहिल्याची उदाहरणे आहेत. पण त्याचप्रमाणे भित्रे व लाचार लोक देखील अश्या प्रसंगी गप्प बसतात हे देखील खरे नाही का? मग, लीनता व नम्रपणा आणि भित्रेपणा व लाचारी यामध्ये काय फरक आहे?

शिक्षक: बाह्यत: दोन्ही सारखेच वाटतात हे खरे आहे. पण, अपमान आणि मृत्युला न घाबरता शांत असणे म्हणजे लीनता व नम्रपणा. याउलट, नुकसान, दुखापत, संकट किंवा मृत्यू यांचा धसका घेऊन अपमान व छळ गिळून गप्प बसणे म्हणजे भित्रेपणा व लाचारी.

विद्यार्थी: पण पुष्कळदा, अन्यायाच्या विरोधात काही न करता शांत राहणे असह्य होते! आपण भित्रे, लाचार आणि नामर्द बनल्याची भावना मनात येते. याला काय करावे?

शिक्षक: हे खरे आहे. आपण ना धड निर्भय असतो, ना आपण पूर्णपणे भित्रे व लाचार. खऱ्या निर्भय लोकांचा अहंकार ईश्वर चरणी लीन झालेला असतो. भित्र्या लोकांचा अहंकार, भीती आणि गरजा यामुळे खच्ची झालेला असतो. आपला अहंकार ना ईश्वरचरणी लीन झालेला असतो, ना भीती आणि गरजांपोटी पूर्णपणे खच्ची झालेला असतो. त्यामुळे आपली गुदमर होते, घुसमट होते, ओढाताण होते.

नामस्मरण करता करता कोणत्याही परिस्थितीच्या अंतरंगाशी किंवा मुळाशी जाण्याची व परिस्थितीचे यथार्थ स्वरूप कळण्याची व त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांतता न भंगता योग्य निर्णय घेण्याची व कृती करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. अश्या निर्णयक्षमतेला आणि कृतीशीलतेलाच आपण लीनता व नम्रपणा म्हणतो.

अन्यायाच्या विरोधात भीतीच्या आहारी जाऊन शांत राहणे म्हणजे भित्रेपणा व लाचारी तर, भितीचेच दुसरे रूप असलेल्या रागाच्या आधीन होऊन अविचाराने स्वत:चा वा दुसऱ्याचा घात करणे हा अविवेक होय. लाचारी व अविवेक ह्या दोन्हीमुळे आपल्याला पश्चात्ताप करावा लागतो, तर लीनता व नम्रपणामुळे समाधान आणि कृतार्थता वाढतच जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1306)  |  User Rating
Rate It


Browse Archive