World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : August 2015
Medical Articles
Aug22
होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार : डॉ. श्रीनि
होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये होम हवन इत्यादींसाठी किंवा अभिषेकासाठी जी वेगवेगळ्या द्रव्यांची नासाडी होते, ती समर्थनीय आहे का? हा पैसा गोरगरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वापरावा असे काही लोकांना वाटते. ते चूक आहे का?

शिक्षक: होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार करताना देखील केवळ पाश्चिमात्य किंवा जडवादी विचारांच्या पगड्यामुळे आपला बुद्धीभेद होतो. अशा विचारांमुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे वरवरच्या नफानुकसानीच्या उथळ दृष्टीकोनातून पाहतो. पूर्वग्रह विरहित समतोल वृत्तीने आणि सखोल दृष्टीने पाहिले तर; ह्या बाबींचे योग्य मूल्यमापन करता येईल. ते तसे करूनच त्यांविषयीची धोरणे ठरवायला हवीत. होम, हवन, इतर उपासना मार्ग आणि विशेषत: नामस्मरण; ह्यांचा आपले आत्मसामर्थ्य वाढण्यासाठी, आंतरिक समाधानासाठी म्हणजेच उर्ध्वगामी उत्क्रांतीसाठी किती उपयोग होतो हे नीट अभ्यासले पाहिजे. तरच शेतकरी आणि इतर गोरगरीबच नव्हेत तर आपल्या सर्वांनाच आंतरिक चैतन्य आणि बाह्य परिस्थिती; दोन्हींमध्ये प्रगती साधणे शक्य होईल, जे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि आपण सर्वांनी; ह्याच दृष्टीने काम करायला हवे.

होम, हवन, अभिषेक इत्यादी बाबींचा मी सखोल अभ्यास केलेला नाही आणि तसा तो न करता, आपल्या पूर्वजांना मूर्ख, निर्दय वा दुष्ट समजून त्यांची आणि ह्या सर्व पूजा विधींची निंदा, निर्भत्सना व निषेध करणे मला योग्य वाटत नाही. पण त्याचबरोबर; त्यांचे सरसकट समर्थन करणेही योग्य वाटत नाही. ह्या सर्व बाबींचा योग्य तो निवाडा होण्यासाठी नामस्मरण सार्वत्रिक व्हावे असे मला वाटते. तसे झाले तर आपल्यातील अनेकांच्या द्वारे; अनेक गूढ आणि रहस्यमय बाबींचा खुलासा होऊ शकेल असे मला वाटते.

विद्यार्थी: जीवनाच्या विविध अंगांकडे नि:पक्षपाती, सकारात्मक आणि विधायक दृष्टीने पाहण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाचे आहे हे मला पटते. पण ते वरपांगी भासते तेवढे सोपे नाही; खरे ना?.

शिक्षक: होय. एका दृष्टीने नामस्मरण हे अगदी सोपे आहे. पण त्याबद्दल गोडी आणि निष्ठा उत्पन्न होण्याच्या दृष्टीने पाहता, ते अत्यंत कठीण आहे. कारण, त्याला चव, रंग, सुवास, मुलायम स्पर्श, सुरेल कर्णमधुरता; काहीच नाही. ते असे सोपे आणि उपाधीशून्य असल्यामुळे त्याबद्दल आवड आणि आस्था तयार होणे कठीण असते. एवढेच नव्हे तर नामस्मरणाने आपला अहंकार देखील फुलत नाही! त्यामुळेच नामस्मरण करताना कंटाळा येतो, खूप शंका येतात आणि खूप विकल्प येतात, जे कितीही चर्चा केली तरी नाहीसे होत नाहीत; तर नामस्मरण केल्यानेच नाहीसे होतात.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (697)  |  User Rating
Rate It


Aug22
आपापली मते: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
आपापली मते: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी बोलताना; नामस्मरणात केलेले कार्य सत्कारणी लागते आणि नामविस्मरणात केलेले वाया जाते; असे आपण म्हणालात. पण पुष्कळदा सामान्य माणसे यासंदर्भातील सरकारी धोरणांच्यावर आपापली मते प्रदर्शित करतात, टीका-टिप्पणी करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

शिक्षक: आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.

विद्यार्थी: याचा अर्थ; सामान्यांची मते लक्षात घेतली जाऊ नयेत असा घ्यायचा का?

शिक्षक: सामान्यांची मते नक्कीच लक्षात घेतली जायला हवीत. पण त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने; त्यांच्या मतांना किती महत्व द्यायचे हे नामस्मरण करणाऱ्या शासकांना बरोबर कळते. ते लोकापवाद किंवा लोकप्रियता यांनी दबून वा बहकून जात नाहीत. लोकप्रतारणा करीत नाहीत आणि लोकानुनय देखील करीत नाहीत. कारण; नामस्मरणाद्वारे; चित्त शुद्ध होत चाललेले वा झालेले शासक; जेव्हां एखादे धोरण आंखतात, एखादा विचार करतात, एखादा संकल्प करतात, एखादी योजना आखतात, किंवा एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, तेव्हां ते सारे नि:स्वार्थ भावनेतून, भेदभाव रहित वृत्तीतून होत असते. ते सारे थेट गुरुमार्फत, विश्वचैतन्याच्या जननीमार्फत वा ईश्वरामार्फत घडत असते. त्यामुळे ते चैतन्याकडे वा ईश्वराकडे नेणारे असते. आणि म्हणून ते विश्वकल्याणाचेच असते. जेव्हा असे लोक; शस्त्रसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, आरोग्यसत्ता, उद्योगसत्ता, शिक्षणसत्ता अशा सर्व सत्तास्थानी येतात आणि राज्य करतात, तेव्हां त्या राज्यालाच रामराज्य म्हणतात.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (773)  |  User Rating
Rate It


Aug22
खरी सत्ता कुणाकडे असते? डॉ. श्रीनिवास जनार्&
खरी सत्ता कुणाकडे असते? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: पुष्कळदा असा प्रश्न पडतो, की कुंभ मेळ्यामधील साधू सरकारच्या सहानुभूतीवर अवलंबून असतात. जर ते सत्याचे पुजारी असतात, तर मग त्यांच्याकडे एवढे सामर्थ्य का नसते? सत्यमेव जयते असे म्हणण्याला काय अर्थ आहे? खरी सत्ता कुणाकडे असते? त्यांच्याकडे की सरकारकडे?

शिक्षक: कुंभ मेळ्यातील साधक आणि साधू; सत्याचे पुजारी असतात, पथिक असतात. ते साक्षात्कारी असतात असे नव्हे. पण म्हणून सरकारच्या हातात सत्ता असते असे थोडेच आहे?
आपल्यापैकी काहीजणांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान, पंतप्रधानाचे निवासस्थान, लोकसभा, इतर शासकीय कार्यालये इत्यादी सत्तेची केंद्रे पाहिली असतील. पण बाहेरून कितीही बडेजाव आणि भपका दिसला तरी त्या सत्ताकेंद्रामध्ये खरी सत्ता कुणाची चालते? ज्यांना आपण सर्वसत्ताधीश समजतो त्यांची? ते खरोखर सर्वसत्ताधीश असतात का?

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर उच्चपदस्थांचे देह, त्यांची बुद्धी, त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांचे मन, त्यांच्या वासना हे सारे त्यांच्या अधीन असते का? त्यांची सत्ता त्यांच्या स्वत:च्या विचारांवर, भावनांवर आणि वासनांवर तरी चालते का? नाही! रोग, अपघात, वृद्धत्व, मृत्यू इत्यादिंवर त्यांची सत्ता चालते का? त्यांच्या शरीरातील हजारो प्रक्रियांवर त्यांचे नियंत्रण असते का? नाही! समाजातील वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा, रीतिरिवाज किंवा एकूण समाजाच्या सामुहिक भावना, त्यांचे उद्रेक, समाजाचे आचार, यांवर त्यांचा अंमल चालतो का? नाही! भूकंप, वादळे, महापूर, दुष्काळ यांवर त्यांचा अंमल चालतो का? नाही! पृथ्वीबाहेरील विश्वात घडणाऱ्या असंख्य घडामोडींवर त्यांचे नियंत्रण असते का? नाही!
मग आपल्यावर, आपल्या सर्वांवर आणि ह्या अखिल विश्वावर कुणाची सत्ता चालते?

जे चैतन्य अजरामर आणि सर्वान्तर्यामी आहे त्याच्या जननीची! ही विश्वाची गुरुमाऊलीच व्यावहारिक दृष्ट्या भिन्न अशा वेगवेगळ्या रुपांनी आपल्याला पाळते, पोसते, सांभाळते आणि सर्वार्थांनी नियंत्रित करते!

नामस्मरण करता करता आपला संकुचित स्वार्थ कमी कमी होत जातो पण खूप खूप आणि अजरामर समाधान देणारा महान स्वार्थ साधतो! म्हणून ह्या मार्गाला परमार्थ मार्ग म्हणतात! ही सारी लीला चैतन्यसत्तेनेच घडून येते!

नामरूप असलेल्या आपल्या गुरुमाउलीशी अशा तऱ्हेने झालेल्या समाधानरूप समरसतेमध्ये समजते की; सदा सर्वदा आणि सर्वत्र; केवळ आपल्या गुरूची, ईश्व्रराची, अंतरात्म्याची,

परमात्म्याची, आंतरिक चैतन्याचे म्हणजेच नामाची ईच्छा आणि सत्ताच काम करते! यालाच आपण राम कर्ता असे म्हणतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (727)  |  User Rating
Rate It


Aug22
कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात? डॉ. श्रीनि
कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यावर विनाकारण वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय होतो असे म्हटले जाते. तुमचे काय मत आहे? किंबहुना; आपण ज्या ज्या गोष्टी करतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात आणि कोणत्या वाया जातात; हे कसे ठरवायचे?

शिक्षक: ज्या लोकांना ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले, त्यांना; संत, साधू, महात्मा, ऋषी, मुनी, तत्ववेत्ते, योगी, महायोगी, ज्ञानी इत्यादी म्हणतात. सत्याचा साक्षात् अनुभव घेतलेल्या लोकांना सद्गुरू म्हणतात. त्यांनी मोठ्या उदार अंत:करणाने आणि आत्मीयतेने त्यांना सापडलेले उत्तर आपल्याला सांगितले आहे.

सत् म्हणजे सत्य. “सत्कारणी” लागणाऱ्या गोष्टी म्हणजे; सत्याकडे नेणाऱ्या आणि सत्यामध्ये समरस होण्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी!

आपण रोज प्रातर्विधी करतो, आंघोळ करतो, पूजा करतो, कपडे धुतो, घरातली साफसफाई करतो, व्यायाम करतो, स्वयंपाक करतो, नोकरी-धंदा करतो, नफा कमावतो, नाव कमावतो, राजकारण करतो, सत्ताकारण करतो, मनोरंजन करतो आणि ह्याशिवाय असंख्य बऱ्या-वाईट गोष्टी करतो. ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सत्याकडे पोचवतात; म्हणजेच “सत्कारणी” लागतात? शिक्षण, क्रीडा, करमणूक, व्यापार, उद्योग, शेती, आरोग्यसेवा, संगीत, नाट्य; अशा कोणत्याही बाबीकडे पहा. ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात! म्हणजेच त्यांत घातलेले पैसे, श्रम आणि वेळ वाया जातात, व्यर्थ जातात, फुकट जातात!
वास्तविक; आपले अंतर्बाह्य व्यापणारे चैतन्य आपल्या अंत:करणातल्या आकाशात निरंतर बरसत असते. मनुष्य कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, देशाचा, वंशाचा, व्यवसायाचा वा वयाचा असो, याला अपवाद असत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य व्याधीग्रस्त असो वा निरोगी, अपंग असो वा धडधाकट, अशक्त असो वा सशक्त, व्यसनी असो वा निर्व्यसनी, अपराधी असो वा निरपराधी आणि गरीब असो वा श्रीमंत याला अपवाद असत नाही. अगदी जगभरातल्या बलाढ्य देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपवाद असत नाहीत! पण आपण; आपल्याच हृदयात बरसणाऱ्या ह्या चैतन्याच्या विस्मृतीमुळे ते इतके नजीक असतानाही त्याला ओळखत नाही आणि त्याचे महत्व जाणत नाही! उलट; त्याला पारखे होऊन चैतन्यतृष्णाक्रांत होऊन चैतन्याच्या एका एका थेंबासाठी कासावीस होत असतो, तडफडत असतो!
नामस्मरण म्हणजेच चैतन्याचे, सत्याचे स्मरण. त्याची जोड मिळाली की, आपली प्रत्येक कृती सत्कारणी लागते आणि त्याची जोड मिळाली नाही तर; म्हणजेच नामाच्याविस्मरणात; आपली प्रत्येक कृती वाया जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (732)  |  User Rating
Rate It


Aug20
चैतन्याविषयीची निष्ठा: डॉ. श्रीनिवास जनार
चैतन्याविषयीची निष्ठा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

शिक्षक: कुंभ मेळ्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये हजारो घटना घडत असतात. पण त्यातल्या काही आपल्या अधोगतीला कारणीभूत असतात तर काही उन्नतीला. ज्या बाबी भगवंताच्या नामाविषयीची; म्हणजेच भगवंताविषयीची; म्हणजेच आपल्या अंतर्यामीच्या चैतन्याविषयीची निष्ठा कमी करतात आणि ज्यांमुळे आपण अधिकाधिक सुस्त, बेपर्वा, संकुचित, असहिष्णू, बेचैन, परावलंबी, लाचार किंवा क्रूर बनतो, त्या सर्व बाबी घातक असतात. ज्या बाबी भगवंताच्या नामाविषयीची; म्हणजेच भगवंताविषयीची; म्हणजेच आपल्या अंतर्यामीच्या चैतन्याविषयीची निष्ठा वाढवतात त्या कल्याणकारी असतात.

विद्यार्थी: कुंभ मेळ्याला नावे ठेवण्यापूर्वी किंवा त्याचा उदो उदो करण्यापूर्वी सर्वच घटना किंवा बाबी आपण ह्या निकषावर तपासल्या पाहिजेत!

शिक्षक: अगदी बरोबर आहे. किंबहुना आपले संपूर्ण जीवनच ह्या निकषानुसार जर विकसित करता आले तर कल्याणकारी होईल. आपल्याकडे जे समाजकारण, राजकारण व अर्थकारण चालते, ते जर अध्यात्मावर आधारित आणि अध्यात्मकेंद्रित असेल तर ते सर्वांच्या हिताचे होईल आणि सर्वांच्या आकांक्षा पूर्ण होतील. त्यातूनच सर्वांचे आर्त, तृप्त होईल.

विद्यार्थी: ते कसे काय?

शिक्षक: हे पहा; विश्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या अंतर्बाह्य; सर्वत्र असणाऱ्या चैतन्याला आपण सच्चिदानंद म्हणतो. सत् म्हणजे चिरंतन, चिद् म्हणजे चैतन्यमय आणि आनंद म्हणजे प्रसन्नता. हे अजरामर चैतन्य अनादी आणि अनंत आहे. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण प्रत्येक कणाकणामध्ये असते, त्याप्रमाणे अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्याची ओढ प्रत्येक जीवात असते! ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण अनिवार्य आणि अपरिहार्य असते त्याचप्रमाणे ही ओढ अनिवार्य आणि अपरिहार्य असते. आणि ह्या ओढीलाच संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज विश्वाचे आर्त म्हणतात. पण प्रत्येक निर्जीव कणाला ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान असत नाही त्याप्रमाणे प्रत्येक सूक्ष्म जीवाला, वनस्पतीला किंवा प्राण्याला स्वत:ची सच्चिदानंदाची ओढ, स्वत:चे आर्त; जाणवत नाही! पण ते आर्त जाणवो वा न जाणवो; ते असतेच असते; आणि ते अपरिहार्य असते!
अशा तऱ्हेने हे आर्त सर्वांचेच असल्यामुळे ह्याभोवती सर्व धोरणे, कायदे, नियम, योजना, कार्यक्रम आंखले की ते सर्वांना समाधान देउ लागतात. उदाहरणार्थ; आंतरिक चैतन्याची म्हणजेच नामाची आठवण आणि पूजा ज्या स्थानी होते आणि ज्या व्यक्तींकडून होते, ती स्थाने आणि त्या व्यक्ती समाजाचे मूलाधार असतात. त्यामुळे त्यांना जपणे, जतन करणे आणि जोपासणे हे शासनकर्त्यांचे सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (875)  |  User Rating
Rate It


Aug20
नामविचार डॉ. श्रीनिवास कशाळीकर(INSIGHTS IN NAMASMARAN DR. SHRINIWAS KASHALIKAR)
नामविचार डॉ. श्रीनिवास कशाळीकर (INSIGHTS IN NAMASMARAN DR. SHRINIWAS KASHALIKAR)

नामस्मरण हा वैद्यकीय अध्ययनाचा आणि वैद्यकीय ज्ञानाचा आत्मा आहे.
NAMASMARAN IS THE SOUL OF MEDICAL STUDY AND MEDICAL KNOWLEDGE.

नामस्मरणाचे महत्व शिकवणे सर्वांच्या हिताचे आहे.
TEACHING THE IMPORTANCE OF NAMASMARAN IS BENEVOLENT TO ALL.

नामस्मरण हा कधीही न संपणारा शक्तीस्त्रोत आहे.
NAMASMARAN IS THE UNENDING SOURCE OF POWER.

नामस्मरण हे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनचे हृदय आहे.
ADVICE OF NAMASMARAN IS THE HEART OF MEDICAL PRESCRIPTION.

नामस्मरण हे वैद्यकीय क्षेत्राचे चैतन्य आहे.
NAMASMARAN IS THE LIFE FORCE OF MEDICAL FIELD.

नामस्मरण हा सम्यक् आरोग्याचा गाभा आहे.
NAMASMARAN IS THE CORE OF HOLISTIC HEALTH.

नामस्मरण हा मूल्यशिक्षणाचा प्राण आहे.
NAMASMARAN IS THE SOUL OF VALUE EDUCATION.

नामस्मरणाशिवाय सर्व अध्यापन अपूर्ण राहते.
ALL TEACHING IS INCOMPLETE WITHOUT NAMASMARAN.

नाम स्मरे निरंतर
ते जाणावे पुण्य शरीर
माहां दोषांचे गिरीवर
रामनामें नासती
श्रीमत् दासबोध

ऐसे माझेनि नामघोषें l नाहीं करिती विश्वाची दु:खें ll
अवघें जगचि महासुखें l दुमदुमित भरलें ll
ज्ञानेश्वरी,९.२००.



कहीं एकाधेनि वैकुंठा जावें l तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ll
ऐसे नामघोष गौरवें l धवळले विश्व ll
ज्ञानेश्वरी,९.२०३


हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् l
कलौ नास्त्यैव नास्त्यैव नास्त्यैव गतिरन्यथाll
भगवान महर्षि व्यास


नामस्मरण ही अचूक रोगनिदानाची गुरुकिल्ली आहे.
NAMASMARAN IS THE KEY TO CORRECT DIAGNOSIS.

नामस्मरण हा वैद्यकीय निर्णयक्षमतेचा कणा आहे.
NAMASMARAN IS THE BACKBONE OF MEDICAL DECISION MAKING.

नामस्मरण; सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवेचा मूलाधार आहे.
NAMASMARAN IS THE BASIS OF ALL THE MEDICAL SERVICES.

नामस्मरण हे सर्वांसाठी अत्यावश्यक आणि समान असे पथ्य आहे.
NAMASMARAN IS AN ESSENTIAL REGIMEN COMMON TO ALL.

नामस्मरणाने कर्मचारी, संस्थाचालक, त्यांची कुटुंबे; आणि संस्थेचे कल्याण होते.
NAMASMARAN IS BENEVOLENT TO EMPLOYEES, EMPLOYERS, THEIR FAMILIES; AND THE ORGANIZATION.

नामस्मरण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे!
NAMASMARAN IS A BIRTHRIGHT EVERYONE!

नामस्मरण ही अज्ञात सहजप्रवृत्ती आहे!
NAMASMARAN IS AN UNIDENTIFIED INSTINCT!

नामस्मरणाची सहजप्रवृत्ती दबून राहणे हे तणावाचे मूळ कारण आहे!
THE ROOT CAUSE OF STRESS IS; SUPPRESSION OF THE INSTINCT OF NAMASMARAN!

नामस्मरण हा संपूर्ण तणावमुक्तीचा गाभा आहे!
NAMASMARAN IS THE CORE OF TOTAL STRESS MANAGEMENT!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (861)  |  User Rating
Rate It


Aug20
अध्यात्म एवढे अवघड? डॉ. श्रीनिवास जनार्दन क&
अध्यात्म एवढे अवघड? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये येणारे अनेक साधक आणि साधू लहानपणापासून अध्यात्माच्या मार्गाला लागलेले असतात. त्यांचे वागणे बोलणे पुष्कळदा अचाटच असते. ते पाहिले की अचंबित व्हायला होते. अध्यात्म एवढे अवघड आणि सर्व सामान्यांपासून दूर आणि त्यांना दुस्तर वा अशक्य असे आहे का?

शिक्षक: अध्यात्म म्हणजे स्वभाव. आपल्या अंतरात्म्याचा भाव. ते एकाला सोपे आणि दुसऱ्याला अवघड कसे असेल? पण काही जण सुरुवातीपासूनच त्यांच्या अंतरात्म्याच्या अधिक निकट असतात किंवा त्याच्याशी म्हणजेच ईश्वराशी जोडले गेलेले असतात; एवढे मात्र नाकारता येणार नाही. पण; आपण रोजच्या जीवनात तरी काय पाहतो? डॉक्टर, वकील, इंजिनीअर, चित्रकार, गायक अशी किती तरी क्षेत्रे असतात. प्रत्येकाला दुसऱ्याच्या क्षेत्रातले काम तेवढ्याच कुशलपणे आणि उत्तमपणे करता येते का? नाही! परंतु, तरीही सर्वांचे अंतीम ध्येय एकच असते आणि ते साध्य करण्यामध्ये सर्वजण एकमेकांची मदत करीत असतातच ना? कुंभ मेळ्याकडे आपण ह्या दृष्टीकोनातून पाहायला हवे असे मला वाटते.

विद्यार्थी: म्हणजे कुंभ मेळ्याबद्दल आणि तेथील साधूंच्या बद्दल आपल्या मनात कुतुहूल, जिज्ञासा, कृतज्ञता आणि आदर असावा पण स्वार्थी आणि परावलंबी अशी आंधळी वृत्ती नको. खरे ना?

शिक्षक: होय. पण आपल्या मनातील याचक आणि लाचार वृती कशी घालवायची? स्वाभिमानी कसे बनायचे? कृतज्ञतेची भावना कशी बाळगायची? आपण कितीही ठरवले तरी; ठरवून आपल्याला कृतज्ञ राहता येतेच असे नाही. नकळत आपण वैतागतो, कंटाळतो, तक्रार करतो, चरफडतो, किरकिरतो!
याचे कारण, नामविस्मरणामुळे आपण; आपल्या स्वत:तील अमृताला आणि जीवनातील चैतन्याला पारखे झालेले असतो! आपल्यासाठी जीवन बेचव आणि विषवत झालेले असते!
कुंभ मेळ्याच्या निमित्ताने; तेथील साधूंच्या कडून आपण नामस्मरण शिकलो तर एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा किमान एखादा थेंब तरी आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागते. अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नसल्या, तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा” मिळाल्यामुळे आपण खरोखरीच कृतज्ञ राहतो आणि “नेहमी कृतज्ञ राहावे” ही साधू संतांची शिकवण आपल्यासाठी सुसाध्य बनते!
नामामृताच्या ह्या थेंबाची महती अशी की; आपल्याला स्पष्टपणे जाणवते की नाम हेच आपले गंतव्य आहे आणि नाम हेच आपले प्राप्तव्य आहे! नाम हेच आपले सर्वस्व आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (825)  |  User Rating
Rate It


Aug20
एरवी कधीही नजरेला न येणारे: डॉ. श्रीनिवास जन&
एरवी कधीही नजरेला न येणारे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

शिक्षक: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांना हे कळू शकते; की सहजासहजी आढळणाऱ्या आणि सुप्रसिद्ध अशा परंपरापासून दूर; एरवी कधीही नजरेला न येणारे; आणि गावा-शहरापासून दूर; एकांतात नामसाधना करणारे असे शेकडो साधू आहेत. पूर्वापार अखंडपणे चालत आलेली त्यांची नामजपाची चैतन्यधारा, त्यांची तपश्चर्या; आपल्याला सहजासहजी दिसत नाही. पण तीच संजीवनी आपला, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा आणि संपूर्ण विश्वाचा; संपूर्ण अधोगतीपासून आणि अध:पतनापासून बचाव करीत आहे! आपणा सर्वांना; संकटात राखत आहे, अडचणीत मदत करीत आहे आणि बिकट परिस्थितीत सावरत आहे!
संत-महात्म्यांचे लोककल्याणकारी अंतरंग आणि त्यांची तपश्चर्या हे चैतन्यसूर्याप्रमाणे असतात. ते चर्मचक्षूना दिसत नाहीत! पण नामस्मरण करीत राहिल्याने ग्रहणक्षमता वाढली की डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणाऱ्या त्यांच्या तपश्चर्येची; आपल्याला अंत:प्रचीती येऊ लागते.
आज अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्याचा शोध आणि अनुभूती घेण्याची जणूकाही जागतिक चळवळ सुरु झाली आहे. वेगवेगळे देश आणि वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांखाली ह्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत आणि होत आहेत. योग, रेकी, ध्यान, भक्ती, सेवा इत्यादी विविध मार्गांनी प्रत्येकाच्या अंतरंगात चैतन्यसूर्याचा उदय होतो आहे. चैतन्यप्रभात होते आहे.

विद्यार्थी: कुंभ मेळ्यासंदर्भात देखील जागतिक पातळीवर प्रचंड कुतुहूल आहे! लाखो परदेशी पाहुणे देखील कुंभ मेळ्यात येताना आढळतात. पण सर, नामस्मरणासंदर्भातील तुमचा जो अनुभव तुम्ही सांगितला, त्याबद्दल मला विचारायचे आहे.

शिक्षक: विचार. असे प्रश्न विचारलेच पाहिजेत!

विद्यार्थी: तुमच्या अंतरात्म्यातून नामस्मरण प्रगट झाले आणि तुम्ही मरता मरता वाचलात. कुणी ह्याला योगायोग म्हणेल तर कुणी स्वसंमोहन! काहीजण विचारू शकतील की; “असे अनुभव सर्वांना कशावरून येतील?”.

शिक्षक: खरे आहे! नामस्मरण करणारे सर्वच जण माझ्याप्रमाणे वाचतात असे नव्हे; आणि नामस्मरण करणाऱ्यांचे अपघात होत नाहीत असे नव्हे. पण त्याचबरोबर हे देखील कळते; की नामस्मरण हे एका विशिष्ट हेतूने (उदा. जीव वाचावा म्हणून किंवा अन्य प्रापंचिक स्वार्थासाठी) केल्यामुळे तो हेतू साध्य होतोच असे नाही हे जसे खरे तसेच नामस्मरण हे मूलतः नामाशी म्हणजेच अंतरात्म्याशी म्हणजेच आपल्या गुरूशी तादात्म्य होण्यासाठीच करायचे असते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (847)  |  User Rating
Rate It


Aug20
संभ्रम आणि संशय : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळ&
संभ्रम आणि संशय : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या संदर्भात आणखी एक प्रश्न येतो. या ठिकाणी येणाऱ्या साधूंच्या आचारावरून, त्यांच्या उत्पन्नावरून आणि त्यांच्या रहस्यमय पार्श्वभूमीवरून पुष्कळदा संभ्रम आणि संशय निर्माण होतो. आमच्यासारख्या सामान्य माणसांनी समाजकल्याणाच्या दृष्टीने पाहता; ह्यातून काय शिकायचे?
शिक्षक: माझ्या मते, कुंभ मेळ्यामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी चैतन्याची साधना करणाऱ्या महान साधकांच्या परंपरा असतात. खऱ्या अर्थाने पाहता; त्या परंपरा म्हणजे; अनादी आणि अनंत अशा अदृश्य विश्वचैतन्याच्या धारा, त्याचे दृश्य कृपाप्रवाह आणि त्याचे दृश्य ओघ आहेत. अव्यक्त अमृताचे व्यक्त स्रोत आहेत! ह्या वेगवेगळ्या काळांमधील वेगवेगळ्या परंपरांनी त्या त्या काळातील राज्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, इतर धनिक लोक आणि सेवाभावी संस्था यांच्या हृदयात अत्युच्च आदराचे स्थान मिळविले आणि त्यांच्याकडून राजकीय, आर्थिक इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये चैतन्यप्रचीतीला पोषक असे कार्य घडविले. ह्या परंपरांनी अंतर्बाह्य व्यापणाऱ्या विश्वचैतन्याशी निगडीत होण्याचे अनेक मार्ग खुले आणि प्रचलित ठेवले आहेत! त्या सर्वांमध्ये अंतरात्म्याचे स्मरण हे सर्वांना समान आहे! त्यामुळे नामसाधनेची चैतन्यधारा ह्या सर्व परंपरांमधून आज प्रामुख्याने आणि अव्याहतपणे वाहत आहे! ह्या चैतन्यधारेच्या कळत नकळत होणाऱ्या परिणामामुळेच; सत्य, शिव आणि सुंदर यांचे अस्तित्व; अनेक प्रकारचे हल्ले परतवून आणि आघात पचवून आज समर्थपणे टिकले आहे आणि एवढेच नव्हे तर जगाच्या हृदयावर अधिराज्य गाजवीत आहे!
विद्यार्थी: कुंभ मेळ्यासारख्या प्रथा “आत्मनो मोक्षार्थम् जगत् हिताय च” म्हणजे “स्वत:ची मुक्ती आणि जगाचे हित व्हावे” ह्याच उदात्त हेतूने आणि भावनेतून निर्माण आणि रूढ होतात का?
शिक्षक: नि:संशय! इथे येणारे पुष्कळसे साधक आणि साधू; प्रापंचिक वा संकुचित स्वार्थामध्ये अडकलेले नसतात. ते निर्दोष नसतील कदाचित. पण सत्याच्या मार्गावरचे पथिक तरी निश्चितच असतात. त्याचप्रमाणे कुंभ मेळ्यासारख्या प्रथा सर्वस्वी निर्दोष नसतील तरी; ढोबळ मानाने पाहता; त्या प्रथांचे प्रयोजन समाजाचे शोषण करण्याचे वा समाजघातकी नसते. दुष्ट नसते. तिथे येणारे सर्वच साधक आणि साधू सर्वज्ञ नसतील. किंबहुना त्यांचाही तसा दावा असत नसावा.
पण अशा तऱ्हेने नि:पक्षपाती आणि पूर्वग्रहविरहित डोळसपणाने पाहण्यासाठी आपण नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे. कुंभ मेळ्यामध्ये देखील आपल्याला असे कितीतरी आखाडे आढळतात, जिथे अखंड नामजप, नामसंकीर्तन किंवा नामधून चालू असतात!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (911)  |  User Rating
Rate It


Aug20
आ वासून पसरलेली दरी : डॉ. श्रीनिवास जनार्दन क
आ वासून पसरलेली दरी : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याचे अनुभव आपण हरघडी ऐकतो. पेपरमध्ये वाचतो. टीव्ही वर बघतो. नामस्मरणाविषयीचा तुमचा एखादा अनुभव सांगा ना!

शिक्षक: १५ ते २० वर्षांपूर्वीची हकीकत आहे. हरिश्चंद्रगडला सहल जायची होती. आपल्याला जमेल का; ह्याविषयी मला शंका होती. कारण हरिश्चंद्रगड चढणे किती कठीण आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती! पण हो ना करता करता मी सहलीला गेलो!
हसत खेळत चढताना मधून मधून दम लागला तरी तेवढ्यापुरती विश्रांती घेत घेत आम्ही चढून गेलो.
पण दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही उतरू लागलो तेव्हां कालच्या श्रमाने पायात अक्षरश: गोळे आले आणि समोरची दरी बघून जीव घाबरून गेला. थोड्या वेळाने समोर भिंतीसारखा उभाच्या उभा पसरलेला तो कातळ (खडक) आला आणि जीवाचे पाणी पाणी झाले! मागे पाठ टेकवून; उभ्या उभ्याच खालच्या दिशेने हळू हळू सरकणे आवश्यक होते. हात पकडण्यासाठी काहीही नव्हते आणि पाय ठेवण्यासाठी जेमतेम खांचा मारलेल्या होत्या! समोरची ४००० फूट खालपर्यंत आ वासून पसरलेली दरी छातीचा थरकाप उडवत होती!
खडकाच्या नेमका मध्यवर पोचतो न पोचतो तोवर पाय थरथरू लागले! मागे, पुढे, वर, खाली, डावीकडे, उजवीकडे कुठेही आणि कोणताही आधार नव्हता! कुणाचा हात मागणे म्हणजे स्वत:बरोबर दरीत पडण्याचे त्याला आमंत्रण देणे!
कोणतेही वैद्यकीय ज्ञान, तंत्रज्ञान, औषध, पाणी, पैसा अडका अशी कुणाचीही कोणतीही मदत मला उपयोगी पडू शकत नव्हती; हे जेव्हां माझ्या ध्यानात आले तेव्हां मी थिजून गेलो! माझे सर्व काही; क्षणार्धात समोरच्या दरीत रसातळाला जाणार होते! आपले अस्तित्व पूर्णपणे संपणार आहे; ह्या भयावह विचाराबरोबर मनात प्रश्न आला; आता उरणार काय? माझ्याबरोबर सर्व विश्वच नष्ट झाल्यावर शिल्लक काय राहणार आहे?
अकस्मात् वीज पडावी तसा लख्ख प्रकाश पडला; माझ्यासकट सर्व नष्ट झाले तरी अनंतकालपर्यंत शिल्लक आणि टिकून राहणारच राहणार असे तत्व आहे माझ्या अंतर्यामी आहे आणि ते म्हणजे नाम! अशा तऱ्हेने ज्या क्षणी नामस्मरण झाले, त्याच क्षणी मी वाऱ्याच्या झुळकीसारखा तरंगत; बघता बघता त्या विशाल खडकाच्या पायथ्यापाशी आलो!
अशा तऱ्हेने आपले जगणे-मरणे आणि बाकी सर्व देखील आपला अंतरात्मा, गुरु, किंवा नामाचीच लीला नाही काय? खरे सांगतो, ह्या अनुभवातून सगळे संकुचित पूर्वग्रह, हट्टाग्रह आणि अभिनिवेश संपत जातात. ह्यातूनच नामनिष्ठा वाढू लागते आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनात चैतन्य बहरू लागते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (902)  |  User Rating
Rate It


Browse Archive